शिवसेनेचे आमदार बाळा सावंत यांच्या निधनामुळे वांद्र्यात पोटनिवडणूक होतेय. शिवसेनेनं तिथं बाळा सावंत यांच्या पत्नी तृप्ती सावंत यांना आधीच उमेदवारी जाहीर केली आहे. तर काँग्रेसचा त्यांच्या प्रथेला साजेसा घोळ नेहमीप्रमाणे सुरू होता. मात्र नारायण राणेंनीही वेळोवेळी निवडणुकीसाठी इच्छुक असल्याचं सांगितलं होतं. तसंच उमेदवारी जाहीर होण्याच्या आधीच राणेंनी शरद पवारांच्या निवासस्थानी जाऊन राष्ट्रवादीचा पाठिंबाही मिळवला होता. त्यानंतर खुद्द सोनिया गांधींनीच राणेंना फोन करून त्यांची उमेदवारी जाहीर केली. त्यामुळे आता इथं काँग्रेस विरूद्ध शिवसेना अशी नव्हे तर राणे विरूद्ध शिवसेना अशी लढत होणार, यात शंका नाही. त्यामुळे यांच्यातल्या संघर्षाने राज्याला परिचित झालेली राडा संस्कृती पुन्हा मुंबईतल्या रस्त्यावर दिसली तर नवल वाटायला नको. त्यातच नारायण राणेंना काँग्रेसमधील प्रिया दत्त, कृपाशंकरसिंग आणि नसीम खान कितपत मदत करतील, या विषयीही शंकाच आहे.
मागील निवडणुकीचं बलाबल पाहिल्यास शिवसेनेची बाजू भक्कम वाटते. गेल्या वेळी शिवसेनेला 41 हजार 544 तर भाजपला 25 हजार 221 मते मिळाली होती. राष्ट्रवादीला 9 हजार 470 तर काँग्रेसला 12 हजार 200 मते मिळाली होती. आता भाजपनंही शिवसेनेला पाठिंबा दिलेला आहे. भाजपचा सेनेला आणि राष्ट्रवादीचा काँग्रेसचा पाठिंबा विचारात घेतला तर नारायण राणेंना तिप्पट पिछाडी भरुन काढावी लागणार आहे.
बाळा सावंत यांच्या निधनामुळे शिवसेना उमेदवार तृप्ती सावंत यांना सहानुभूती मिळू शकते. मात्र या मतदारसंघात असलेलं मुस्लिम आणि दलितांचं प्राबल्य, कोकणी मतदार यावर राणेंची भिस्त असणार आहे. 1999 आणि 2004च्या निवडणुकीत काँग्रेसनं या मतदारसंघात विजय मिळवलेला होता. अर्थात ही सर्व जुनी समीकरणं आहेत. कोकणात होमपिचवर पराभूत झालेल्या नारायण राणेंनाही त्यांची ताकद दाखवून देण्यासाठी संधी मिळालीय. नारायण राणे मैदानात उतरत असल्यानं शिवसेनाही इथं जोर लावणार यात शंका नाही. 'मातोश्री'च या मतदारसंघात असल्यानं पुन्हा एकदा राज्याचं लक्ष या निवडणुकीकडे लागणार आहे. त्यामुळे राणे आणि शिवसेना इर्षेने लढणार हे नक्की....
खमंग फोडणी - तासगावमध्येही आर. आर.पाटील यांच्या निधनामुळे पोटनिवडणूक होणार आहे. तिथं आर. आर. पाटील यांच्या पत्नीला राष्ट्रवादी काँग्रेसनं उमेदवारी दिलीय. तिथं उमेदवार देणार नसल्याचा निर्णय घेत राजकीय पक्षांनी सुसंस्कृतपणा दाखवून दिला. मात्र तासगावातला सुसंस्कृतपणा मुंबईत दिसला नाही. ठिक आहे, पण किमान इथं राडा तरी दिसू नये, ही माफक अपेक्षा.
No comments:
Post a Comment