Saturday, February 21, 2015

संघर्षशील दादा !


1 फेब्रुवारी 2015 रोजी माझे वडील विठ्ठलराव गोरे यांचं निधन झालं. 11 जानेवारीला वडिलांच्या बाईकला एका कारने धडक दिली होती. संभाजीनगरजवळ नगर रोडवर हा अपघात झाला होता. अपघातानंतर कारचालक पळून गेला. पण जवळच असलेल्या बडवे इंजिनिअरींग कंपनीतल्या कामगारांनी वेळीच धाव घेऊन मदत केली. अर्ध्या तासाच्या आत वडिलांना हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. 11 जानेवारीलाच ऑपरेशन झालं. मात्र त्याच दिवसापासून वडील कोमात होते. वयाच्या 65 व्या वर्षी वडिलांनी तब्बल 22 दिवस मृत्यूबरोबर झुंज दिली, संघर्ष केला. वडिलांना आम्ही भावंडं, काका आणि गावाकडची सगळी मंडळी दादाच म्हणायचो.
संघर्ष तर लहानपणापासूनच दादांचा सोबती होता. गंगापूर तालुक्यातल्या आमच्या सोलेगावात शिक्षणाची सोय नव्हती. त्यामुळे पहिलीपासूनच दादांना शिक्षणासाठी घर सोडावं लागलं. मामा आणि आत्याच्या गावाला आठवीपर्यंत शिक्षण घेतलं. कासोडा, एकलहरा, म्हारोळा या ठिकाणी राहून शिक्षण पूर्ण केलं. रोज दहा-दहा किलोमीटर पायपीट केली. नववी-दहावी पर्यंतचं शिक्षण गंगापूरला घेतलं.  गव्हर्मेंट कॉलेजला B.A.चं शिक्षण सुरू असतानाच 1970 मध्ये दादांचा विवाह झाला. 1972च्या भीषण दुष्काळात आईनेही गावाकडे कष्ट केले. 1975 मध्ये वडिलांना परभणीत मराठवाडा कृषी विद्यापीठात नोकरी मिळाली. त्यानंतर आई-वडील परभणीला गेले. माझा जन्म 1977चा, त्याच वर्षी वडिलांची संभाजीनगरला बदली झाली. 1984 पर्यंत आम्ही तिघे भावंडे आणि आई-वडील कृषी विद्यालयाच्या क्वार्टरमध्ये राहत होतो. त्यानंतर पदमपुरा, नक्षत्रवाडी, पुन्हा क्वार्टर आणि शेवटी उल्का नगरीत घर घेतलं. 1985-86 मध्ये दादांनी गावाकडे विहीर खोदण्यासाठी कर्ज घेतलं, विहीर बांधली. या काळात इतर लोक स्वस्तात प्लॉट घेत होते. मात्र दादांना ओढ होती ती गावाची आणि शेतीची. अर्थात हा सर्व आतबट्ट्याचा व्यवहार ठरला. कर्ज वाढलं. पण याचा आमच्या शिक्षणावर परिणाम झाला नाही. तिघा भावंडांना हवं ते क्षेत्र निवडण्याचं स्वातंत्र्य दिलं. माझा लहाना भाऊ रवींद्र शालेय-महाविद्यालयीन जीवनात वक्तृत्व आणि वाद-विवाद स्पर्धेत यश मिळवत होता. याचाही वडिलांना अभिमान होता. रवींद्र याच गुणाच्या जोरावर त्याच्या वकिलीच्या क्षेत्रात यशस्वी होतोय. आपल्या कुटुंबातला पहिला वकिल रवींद्र झाल्याचा दादांना सार्थ अभिमान होता. माझी बहिण शिक्षिका झाली. तिला सरकारी नोकरी मिळाली, ते ही लाच न देता. हा प्रसंग वडील वारंवारपणे सांगायचे.
शिक्षणाची आवड असणा-या दादांनी आम्ही लहान असताना M.A. पूर्ण केलं. निरक्षर असणा-या आमच्या आईला साक्षर केलं. लहाण्या काकाचंही शिक्षण पूर्ण केलं. गावाकडे गेल्यावर तसंच लग्न कार्याच्या निमीत्ताने एकत्र आल्यावरही दादा शिक्षणा विषयी बोलायचे. मुलींना शिकवा, त्यांचं लवकर लग्न करू नका, हे सांगायचे. दहावीनंतर कृषी पदविका या अभ्यासक्रमाला अनेकांना दादांनी प्रवेश मिळवून दिला.
2008 मध्ये दादा रिटायर झाले. मात्र त्यानंतर दादा जास्तच अॅक्टिव्ह झाले. गावाकडे संस्था स्थापन केली. त्या माध्यमातून शेतीचे उपक्रम सुरू केले. कृषी शास्त्रज्ञांचे मार्गदर्शन, शेतकरी मेळावे या माध्यमातून आधुनिक तंत्रज्ञान शेतक-यांपर्यंत पोहोचवण्याचा त्यांचा प्रयत्न होतो. शेतक-याच्या पिकाला भाव मिळत नाही, याची त्यांना खंत होती.  मात्र आयुष्याच्या या टप्प्यावर वडील रोज सकाळी एक तास वॉक करायचे. तीन महिन्यापूर्वी ज्येष्ठ नागरिकांच्या मॅरेथॉनमध्ये दादांचा दुसरा क्रमांक आला होता. सर्व कसं छान सुरू होतं. मात्र त्या अपघाताने दादांना हिरावून मोठा आघात केला. असं असलं तरी सतत संघर्ष करून कधीच हार न मानणारे दादा, भविष्यातही मानसिक बळ देत राहतील.

1 comment: