Thursday, October 4, 2012

अभंग - न्यूजरूम माझी पंढरी, बातमी विठ्ठल !

प्रिय वाचकांनो, मागील आठवड्यात 'तुकाराम' चित्रपट पाहिला. स्टार प्रवाहवर, ( हे चॅनेल चांगला चित्रपट असेल तरच पाहिलं जातं. ) या चित्रपटात संतू तेली  हे पात्र होतं. लहानपणी सगळ्याच संतोष नावाच्या मुलाला संत्या म्हणतात. काहींना संतूही म्हणतात. त्याला मी अपवाद नाही. त्याच न्यायाने मलाही अभंग सुचला. तुकारामांनी संतू तेलीला त्याच्या आजूबाजूच्या घटनांमध्ये देव पाहून अभंग लिहण्याचा सल्ला दिला. मला तो सल्ला आवडला. आणि पहा कसा अभंग तयार झाला. पत्रकारितेवरचा हा अभंग. वाचा आणि कळवा. कळकळीने.
------------------------------------------------------------------------------------------------------------

न्यूजरूम ही माझी पंढरी !
बातमी असे माझा विठ्ठल  !
ब्रेकिंग न्यूज खल उडवी दाणादाण  !
त्याप्रसंगी बुलेटिन प्रोड्युसर अर्धा गतप्राण  !
न्यूजरूमच्या गाभा-यात करती काम नारी - नर  !
काही अंग मोडून करती काम  !
तर काही हुशार करती कामाचा देखावा  !
मात्र चेह-यावर भार जणू सगळी पृथ्वी उचलल्याचा  !
हे वारकरी चोराच्या आळंदीचे ओळखावे  !

इनपूट - आऊटपूट देते बातमी करून काथ्याकूट  !
शनिवार - रविवार फिचरचे मेतकूट  !
मोकळा श्वास घ्यायला मिळे फुरसत  !
काही नाईट शिफ्टमध्ये करती बातमीरूपी विठ्ठलाची भक्ती  !
त्यांनी केलेले पॅकेज ठरती मॉर्निंग शिफ्टची शक्ती  !

वाहिनीवर चर्चा, फोनो, LIVE होती तिरीमिरीत  !
बातमी सादर करणा-या अँकरमध्ये पहावा विठ्ठल  !
TRPचे फळ मिळवण्यासाठी करावे काम  !
निष्काम कर्मयोग्याचे हे क्षेत्र नव्हे  !

करोनिया गट, भक्कम करावी तटबंदी  !
विरोधकांची उडवावी दाणादाण  !
बडव्यांच्या जवळ जाऊन, साध्य करावे इप्सित  !
विठ्ठलाचा साक्षात्कार झाल्याचा तो भास  !

कधी आरंभ नव्या दिंडीचा  !
तर कधी समाप्ती सप्ताहाची  !
शाश्वत अश्वत्थामा कुणी इथे नसे  !

काही वारक-यांना कॅन्टीनमध्ये दिसे विठ्ठल  !
तेथेच चाले त्यांचे गप्पा, प्रवचन आणि कीर्तन  !
अल्प काम करून, जमवावी मार्केटिंगची  हातोटी  !
नसता हातोटी, ख-या कामाचीही होते खोटी  !

काही हुशार ओळखून वा-याची दिशा  !
बदल घडवून, बदली स्वत:ची ग्रहदिशा  !
हे कसब सकळांनी शिकावे  !
कार्यकौशल्यापेक्षा महत्तवाचे हे गुण  !
सांगत असे संतू पत्रकार घ्यावे शिकून  !

No comments:

Post a Comment