इतिहासाची पुनरावृत्ती होत असते, हे वाक्य ब-याच वेळेस आपण वाचतो. मात्र मला सध्या त्याचा अनूभव येतोय. अर्थात असा काही फार मोठा इतिहास घडवला नव्हता, की ज्याची पुनरावृत्ती होत आहे. मात्र काही घटना पुन्हा घडत आहेत. मागच्या महिन्यापासून माझा मुलगा वेद फर्स्ट स्टॅण्डर्डमध्ये जावू लागला आहे. जून महिन्यात त्याच्या वह्या, पुस्तकं, स्कूल बॅगची खरेदी झाली. त्या खरेदीच्या वेळी माझं मनही लहानपणीच्या शालेय़ साहित्य खरेदीच्या आठवणीत रमून गेलं होतं.
शिक्षण घेतानाच्या काळातला डॉ. बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठातला कालखंड अजूनही माझ्या मनात ताजा आहे. शाळा आणि कॉलेजपेक्षाही मला विद्यापीठ जास्त भावलं. कारण मी तिथं प्रेमात पडलो होतो. थांबा, मी इथं कोणताही गौप्यस्फोट करणार नाही. मी प्रेमात पडलो होतो, ते आमच्या विद्यापीठातल्या जर्नलिझम अॅण्ड मास कम्युनिकेशन डिपार्टमेंटच्या प्रेमात. तिथली दोन वर्ष, तिथं भेटलेले सहकारी अजूनही माझ्या आठवणीत आणि कॉन्टॅक्टमध्ये आहेत. मुलाला शाळेत जाताना पाहून माझीही पुन्हा शिकण्याची ऊर्मी जागृत होत होती. अर्थात शाळेत शिकण्याची नव्हे, तर पुन्हा विद्यापीठात शिकण्याची.
आणि 'इच्छा तिथं मार्ग' या उक्तीनं मुंबई विद्यापीठाची जाहिरात पाहण्यात आली. फ्रेंच भाषेच्या सर्टिफिकेट कोर्सची ती जाहिरात होती. माझीही कॉलेजमध्ये असल्यापासून फ्रेंच भाषा शिकण्याची इच्छा होती. कॉलेजमध्ये सायकोलॉजीचा अभ्यास करताना अनेक फ्रेंच शास्त्रज्ञांची नावं वाचनात यायची. सायकोलॉजीमध्ये फ्रेंच शास्त्रज्ञांनी मोठ्या प्रमाणात भर घातलेली आहे. त्यामुळं त्या शास्त्रज्ञांनी लिहलेलं अनुवादीत वाचण्यापेक्षा थेट फ्रेंच शिकावं अशी माझी इच्छा होती. ती जाहिरात पाहून थेट कलिनाला मुंबई विद्यापीठात गेलो. फ्रेचं डिपार्टमेंटला अर्ज दाखल केला आणि प्रवेशही घेतला.
मी फ्रेंच शिकण्यासाठी प्रवेश घेतला आहे, याची मोठी बातमी झाली. एखादी ब्रेकिंग न्यूज आल्यानंतर न्यूज रूममध्ये जशी दाणादाण उडते तशी दाणादाण माझ्या सहका-यांची उडाली. कसं काय जमवलं ? आम्हाला का सांगितलं नाही ? मला प्रवेश मिळेल का ? फ्रेंच शिकण्यासाठी किती मुली आहेत ? हे आणि अशाच आशयाचे अनेक प्रश्न सहका-यांनी विचारले. काहींनी तर आता लवकरच 'झी 24 तास'चं फ्रेंच बुलेटिन ऑन एअर जाणार असून संतोष गोरे ते प्रोड्यूस करणार असल्याचं सांगितलं. यालाही माझी हरकत नव्हती. मात्र मराठीत केलेली अँकरींगची तयारी किमान फ्रेंचसाठी तरी कामी येईल असं वाटलं होतं. मात्र माझ्या सहका-यांनी इथंही ती संधी मला नाकारायचीच असा जणू पण केला असावा.
शिकण्याची भाषा करणं, आणि भाषा शिकणं यात मात्र मोठा फरक असतो, हे या निमीत्तानं कळालं. संभाजीनगरला विद्यापीठात जर्नलिझम डिपार्टमेंटला शिकत असतानाचा तो मंतरलेला काळ पुन्हा डोळ्यासमोर येतो आहे. त्या दोन वर्षात मी आणि माझे मित्र सकाळी दहा ते संध्याकाळी पाच पर्यंत डिपार्टमेंटमध्ये थांबोयचो. सर्व लेक्चर अटेंड करणं, लायब्ररीमध्ये वाचन करणं, डिपार्टमेंट काढण्यात येणा-या अनियतकालिकाचं संपादन करणं, हे सर्व डोळ्यासमोर तरळून गेलं. सप्टेंबर 2000 मध्ये बॅचलर ऑफ जर्नलिझमला असताना अनियतकालिकात मी लिहलेला अग्रलेख गाजला होता. 'मराठी पाऊल पडते कुठे ?' हा जळजळीत शैलीत लिहलेला अग्रलेख सगळ्यांनाच भावला. तेव्हा गेस्ट लेक्चरसाठी डिपार्टमेंटला आलेले सामनाचे संभाजीनगर आवृत्तीचे तत्कालीन निवासी संपादक विवेक गिरधारींनी अनियतकालिकाचं प्रकाशन केलं होतं. अनियतकालिकावर माझं संपादक म्हणून झळकलेलं नाव पाहून मूठभर मास वाढलं होतं. प्रत्येक मित्र आणि नातेवाईकाच्या घरी जाऊन त्या नियतकालिकाच्या प्रतींचं वाटप करण्याचं काम महिनाभर तरी सुरू होतं. म्हणेज आता जरी बुलेटिन प्रोड्युसर म्हणून कार्य करत असलो तरी, मी संपादक म्हणून आधी काम केलं आहे, हे आता चाणाक्ष ( आणि काही धूर्त ) वाचकांच्या लक्षात आलं असेलच. शैक्षणिक सहली, डेझर्टेशन, कंटेन्ट अॅनलेसिस हे सर्व करताना दोन वर्षांचा काळ सरला. प्रा. सुधीर गव्हाणे, प्रा.डॉ. वि. धारूरकर, प्रा, सुरेश पुरी यांची शिकवण्याची शैली अजूनही स्मरणात आहे. तेव्हा भेटलेले अनंत साळी, शशिकांत टोणपे, डी.एम. भोसले, मंगेश मोरे, सुनील खांडेभराड, रमेश रावळे, निरा देवकत्ते, रेणूका रकवाल, तानाजी कांबळे, शेखर मगर, किरण जाधव, आसाराम, पी.टी. पांडे हे मित्र अजूनही संपर्कात आहेत. आता पुन्हा याच आठवणींचा स्मृतीगंध मनात जपून विद्यापीठाची वाट धरली आहे. संभाजीनगरला विद्यापीठात शिकत असताना जर्नलिझममध्ये करिअर करण्याचं स्वप्न होतं. ते स्वप्न पुढच्या काळात साकार झालं. गुरूजनांच्या मार्गदर्शनाखाली घेतलेली मेहनत फळाला आली. आता पुन्हा तशीच मेहनत भाषा शिकताना घ्यायची आहे. पुन्हा त्याच इतिहासाची किंवा घटनांची म्हणा, पण पुनरावृ्त्ती होणार आहे. कारण मी इथं पुन्हा प्रेमात पडलो आहे, विद्यापीठाच्या....
आपला ’पुन्हा विद्यापीठात जाताना’ हा सुंदर लेख वाचला. दुर्दैवाने मला कठिण आर्थिक परिस्थितीमुळे विद्यापीठात जाता आले नाही. १९४२ मध्ये मी मुंबई विद्यापीठाची मॅट्रिकची परीक्षा उत्तीर्ण झालो व लगेच नोकरी करू लागलो. त्याकाळी मॅट्रिक म्हणजे आत्ताची अकरावी,मुंबई विद्यापीठाची पहिली परीक्षा होती. त्यादृष्टीने मी विद्यापीठात गेलो होतो असे म्हणता येईल.
ReplyDeleteशिक्षण फारसे होऊ शकले नाही याचा मात्र आयुष्यात तेवढासा तोटा झाला नाही. १९८६ साली मी गोव्याच्या राज्यपालांचा सचीव म्हणून निवृत्त झालो. साहित्यक्षेत्रात काही थोडी कामगिरी करू शकलो. कष्ट करावे लागले पण कष्ट कोणाला करावे लागत नाहीत? असो.आता ८७ वर्षे ओलांडत आहे. आपण छान लिहिता. मी नेहमी आपली अनुदिनी वाचत असतो. आमचीही काही लेखकांची www.maitri2012.wordpress.com ही अनुदिनी आहे. त्याची लिंक आपणास पाठवीत जाईन. धन्य्वाद.
यशवंत कर्णिक
छान.. मस्त वाटले. वाचताना मला माझाही डिपार्टमेंटमधील काळ आठवला...
ReplyDelete