चला आता लोकसभेच्या निवडणुकीला सुरूवात झालीय. त्यामुळे पाच वर्ष अडगळीत पडलेला आम आदमी आता आम राहिलेला नाही. राम पुन्हा त्यांच्या जन्म ठिकाणी जाण्याचीही शक्यता निर्माण झालीय. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तीन ते चार आघाड्याही निर्माण झाल्यात. सर्वच पक्षांनी तिकीट दिलेले उमेदवार आता त्यांचे अर्ज दाखल करताहेत. मोठ्या जल्लोषात उमेदवार अर्ज दाखल करताहेत. एकाच मतदारसंघातून उभे असलेले सर्वच उमेदवार आपण जिंकणार असल्याचा दावाही करताहेत. आता यात नवल आणि वेगळं वाटावं असं तरी काय आहे ?
यात वेगळं असं काहीच नाही. मात्र किती निवडणुकांमध्ये हे सहन करायचं, याचा विचार आता करावाच लागेल. सर्व राष्ट्रीय पक्षांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तरी लक्षात येतं की, निवडणूक लढवणं हे आता सर्वसामान्यांचं काम राहीलेलं नाही. निवडणूक लढवायची असेल तर तुमचा जन्म राजकीय घराण्यातच व्हायला हवा. नाही तर तुमच्याकडे गडगंज संपत्ती हवी. किंवा गुन्हेगारी क्षेत्रातल्या करीअरचा ग्राफही उंचावलेला असेल तरच तुम्हाला तिकीट मिळेल.
निलेश राणे, मिलिंद देवरा, प्रिया दत्त या तिघांनी कोणतं असं अतुलनीय कर्तृत्व केलंय की त्यांना काँग्रेसने खासदारकीचे तिकीट दिले. नारायण राणे यांनी तर शिवसेनाप्रमुखांवर पुत्र प्रेमाने आंधळे झाल्याचा आरोप केला होता. मात्र सिंधुदुर्ग - रत्नागिरीतून खासदारकीचे तिकीट नारायण राणे यांनी स्वत:च्या मुलासाठीच घेतले. यावेळी ते पुत्रप्रेमात डोळस झाले. इतर पक्षात अन्याय होतोय असा आरोप करणारे नेतेही मुलांच्याच भवितव्याची काळजी घेणार असतील, तर ज्यांच्या जिवावर स्वाभिमानाचं राजकारण होतं ते कार्यकर्ते फक्त राडाच करणार हे आता स्पष्ट आहे. काँग्रेस का हाथ आम आदमीच्या कामी आला की नाही हे निकालानंतर कळेल. नेत्यांचे राजकीय वारसदार जपण्याचे काम मात्र चोखपणे बजावण्यात आल्याचं दिसून येतंय.
युवकांना निवडणुकीत संधी देण्याची भाषा करणा-या सगळ्याच पक्षांनी राज्यात विद्यमान खासदार, माजी खासदार, नेत्यांची कर्तृत्ववान (दिवटे) मुले यांनाच तिकीटे दिली आहेत. यात कोणत्याही पक्षात मतभेद नसल्याचं दिसून येतं. त्यामुळे नेत्यांसाठी रस्त्यावर उतरणा-या सामान्य कार्यकर्त्यांनी आता विचार करण्याची वेळ आलीय. तुम्ही फक्त राडा करायचा, सतरंज्या उचलायच्या आणि खासदारकी, आमदारकी उपभोगायची ती नेत्यांच्या दिवट्यांनी.
मला मान्य आहे नेत्यांच्या मुलांना उमेदवारी देऊन सामान्य कार्यकर्त्यांवर अन्याय होतो.परंतु कार्यकर्त्यांनाही नवे मार्ग अवलंबयला मार्ग मोकळे आहेत.कार्यकर्त्यांनीही आपले नेटवर्क स्ट्रॉँग केले पाहिजे.भाजपाला इच्छा असूनही पूनम महाजनला तिकीट देता आले नाही.प्रत्येक पक्षात अशा प्रकारचे किरीट सोमय्या तयार व्हायला हवेत.
ReplyDelete