Saturday, February 18, 2023

शिवसेना : बाळासाहेब ते शिंदे

 

शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरेंनी स्थापन केलेल्या शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. 56 वर्ष ज्यांची पकड होती त्या शिवसेनेवर आता ठाकरे कुटुंबाचं वर्चस्व राहिलेलं नाही. 19 जून 1966 रोजी बाळासाहेब ठाकरेंनी मुंबईतल्या शिवाजी पार्कवर शिवसेनेची स्थापना केली होती. मुंबईत मराठी माणसांच्या हक्कासाठी शिवसेनेनं आक्रमकपणे लढली. सुरवातीला मुंबई आणि ठाणे परिसरात जोमानं वाढलेली शिवसेना ऐंशीच्या दशकात राज्यात विस्तारासाठी सज्ज झाली. 1990 च्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे 40 पेक्षा जास्त आमदार निवडून आले होते. 1995च्या विधानसबा निवडणुकीत शिवसेनेचे 75 आमदार निवडून आले होते. राज्यात पहिल्यांदाच बिगरकाँग्रेसी असलेलं युती सरकार सत्तेत आलं होतं. 

1999 नंतर शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे राजकारणात जास्त सक्रीय नव्हते. कारण उद्धव ठाकरे पक्षात सक्रीय होऊ लागले होते. महाबळेश्वरमध्ये 2003ला शिवसेनेच्या शिबिरात उद्धव ठाकरेंना शिवसेनेच्या कार्याध्यक्षपदी नेमण्यात आलं. शिवसेनेसाठी हा मोठा टर्निंग पॉईंट होता. त्याचे पडसाद पुढच्या दोन वर्षातच उमटले. 2005 मध्ये नारायण राणेंनी शिवसेना सोडली. तर 2006 मध्ये राज ठाकरेंनी शिवसेना सोडून मनसेची स्थापना केली होती. शिवसेना या धक्क्यातूनही सावरली. 2014 मध्ये उद्धव ठाकरेंनी स्वबळावर 63 जागा जिंकल्या. 2019 मध्ये शिवसेना भाजपची पुन्हा युती झाली. शिवसेनेनं 56 जागा जिंकल्या. मात्र शिवसेनेनं भाजपची साथ सोडून मविआच्या साथीनं सत्ता स्थापन केली. हा शिवसेनेसाठी दुसरा मोठा टर्निंग पॉईंट ठरला. या सत्तेमुळे शिवसेनेतील हिंदूत्ववादी नेते दुखावले. राष्ट्रवादी काँग्रेसचं वर्चस्व पक्षाला मारक ठरत असल्यानं एकनाथ शिंदेंनी दुसरा गट स्थापन करून भाजपच्या मदतीनं सत्ता स्थापन केली. त्यानंतर सुप्रीम कोर्टातली आणि निवडणूक आयोगातली लढाई सुरू झाली. निवडणूक आयोगातली लढाई एकनाथ शिंदेंनी जिंकली. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हं एकनाथ शिंदेंना मिळालं. पक्षावरील ठाकरे कुटुंबाची सत्ता संपुष्टात आली. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या हयातीतही शिवसेनेनं अनेक बंड पाहिले, पक्षांतरं पाहिली. छगन भुजबळ, गणेश नाईक, नारायण राणे, राज ठाकरे यांनी शिवसेनेला जय महाराष्ट्र केला. पण या आघातानंतरही शिवसेना वाढली. इतके सर्व बंड पचवणारी शिवसेना आता एकनाथ शिंदेंकडे गेली आहे. बाळासाहेब ठाकरेंपासून सुरू झालेली शिवसेनेची वाटचाल आता एकनाथ शिंदेंच्या नेतृत्वात सुरू झाली आहे.

आव्हान वाढलं...

उद्धव ठाकरे यांच्यासमोर आतापर्यंतचं सर्वात मोठं आव्हान निर्माण झालं आहे. पक्ष आणि चिन्हं हे दोन्ही त्यांच्या हातून एकनाथ शिंदेंकडे गेले आहेत. त्यामुळे आता शुन्यातून सुरूवात करण्याची वेळ उद्धव ठाकरेंवर आली आहे. त्यामुळेच उद्धव ठाकरे आक्रमकपणे रस्त्यावर उतरले. उद्धव ठाकरेच नव्हे तर त्यांच्या पत्नी रश्मी ठाकरे, मुलगा आदित्य आणि तेजस ठाकरेंनीही मैदानात शड्डू ठोकला. पक्ष पुन्हा उभा करण्यासाठी ठाकरे कुटुंबानं आता रस्त्यावरील लढाई सुरू केली आहे. शिवसैनिकांमध्ये पुन्हा जोश निर्माण करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी भाषण करून मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना थेट आव्हान दिलं. तुम्ही धनुष्यबाण घेऊन या, मी मशाल घेऊन येतो अशा शब्दात त्यांनी निवडणूक लढवण्याचं आव्हान दिलं. उद्धव ठाकरेंनी शिवसैनिकांना निवडणुकीच्या तयारीला लागण्याचं आवाहन केलंय. मात्र हे आव्हान उद्धव ठाकरेंसाठी प्रचंड खडतर असणार आहे.

कारण 40 आमदार आणि 13 खासदार एकनाथ शिंदेंसोबत आहेत. अनेक माजी खासदार, आमदार आणि पदाधिकारी एकनाथ शिंदेंसोबत आहेत. शिवसेना पक्ष आणि धनुष्यबाण चिन्हही एकनाथ शिंदेंना मिळालं आहे. धनुष्यबाण चिन्हं सर्वांच्या परिचयाचं आहे. त्यामुळे नवं चिन्ह घेऊन उद्धव ठाकरेंना मतदारांसमोर जावं लागणार आहे. पहिल्या आणि दुसऱ्या फळीतले नेते एकनाथ शिंदेंसोबत आहेत. उद्धव ठाकरेंसोबत मोठे नेते नाहीत. त्यामुळे मतदारांसमोर भाषण करायला उद्धव ठाकरेंसमोर दुसरा कोणताही पर्याय नाही. त्यामुळे फक्त सामान्य शिवसैनिकांनाच सोबत घेऊन त्यांना लढाई लढावी लागणार आहे.

मुंबई महापालिकेसह राज्यातील इतर महापालिकांच्या निवडणुका कधीही जाहीर होऊ शकतात. लोकसभा निवडणुकाही एका वर्षावर आल्या आहेत. आणि त्या आधीच पक्ष आणि चिन्हं गेल्यानं उद्धव ठाकरेंना नव्यानं पक्षाची बांधणी करावी लागणार आहे. एकंदरीतच ऐतिहासिक संकटावर उद्धव ठाकरे कशा प्रकारे मात करतात? यावर त्यांची पुढील वाटचाल अवलंबून असणार आहे. #संगो