केंद्र सरकारच्या विरोधात पर्याय देण्यासाठी कसरत सुरू झाली आहे. तिसऱ्या आघाडीचा पोलिटिकल गिअर टाकण्यात आला आहे. त्यासाठी तेलंगणाचे मुख्यमंत्री चंद्रशेखर राव यांनी पुढाकार घेतलाय. बिगर-भाजपशासित राज्यांनी एकत्र यावे, यासाठी त्यांची धडपड सुरू आहे. त्याचसाठी त्यांनी मुंबईत येऊन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांची भेट घेतली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांच्या एकजुटीला पाठिंबा दिला. चंद्रशेखर राव यांनी तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के.स्टॅलिन, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांच्याशी दूरध्वनीवरून संपर्क साधला होता. दिल्लीत बिगर- भाजपशासित राज्यांच्या मुख्यमंत्र्यांची लवकरच बैठक होणार आहे.
तिसऱ्या आघाडीसाठी टाकण्यात आलेल्या या गिअरमुळे भाजप विरोधातली गाडी किती सुसाट धावेल? या विषयी शंकाच आहे. कारण महाराष्ट्रात लोकसभेचे 48 मतदारसंघ आहेत. तर बंगालमध्ये 42, तामिळनाडूत 39 आणि तेलंगणामध्ये 17 मतदारसंघ आहेत. म्हणजेच या चार राज्यात लोकसभेच्या एकूण 146 जागा आहेत. आणि त्यातल्या 100 जागा जरी तिसऱ्या आघाडीला मिळाल्या असं गृहित धरलं तरी केंद्रातल्या सरकारवर काहीही परिणाम होणार नाही. तिसऱ्या आघाडीत काँग्रेसला घेणार की नाही? हे अजून स्पष्ट झालेलं नाही. समाजवादी पार्टी, बहुजन समाज पार्टी, राष्ट्रीय जनता दल, आप या पक्षांची काय भूमिका असेल? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा आहे.
देशात आतापर्यंत तिसऱ्या आघाडीचा प्रयोग कधीही यशस्वी झालेला नाही. सरकार स्थापलं तरी ते 5 वर्ष टिकलेलं नाही. त्यामुळे तिसऱ्या आघाडीविषयी मतदारांच्या मनात विश्वसनीयता निर्माण होत नाही. आणि समजा तिसरी आघाडी अस्तित्वात आली तरी त्यांचा पंतप्रधान पदाचा चेहरा कोण असणार? हा प्रश्नही तितकाच महत्त्वाचा असणार आहे. परिणामी चार मुख्यमंत्री एकत्र दिसत असले तरी पंतप्रधानपदाचा चेहरा स्पष्ट होत असल्यानं 'तिसरा' गिअर अडकण्याचीच शक्यता जास्त वाटते. #संगो