रिपाइं नेते रामदास आठवले यांचा शिर्डी लोकसभा मतदारसंघात पराभव झाल्यानंतर त्यांनी काँग्रेसवर जोरदार टीका केली. काँग्रेसच्या नेत्यांनी सहकार्य केले नाही, असा आरोपही त्यांनी केला. काँग्रेस पक्ष ही काही कमी जातीयवादी नसल्याचंही त्यांना आठवलं. ज्या शिर्डीत रामदास आठवले निवडणुकीसाठी उभे होते, तेथे साई बाबांचे मंदिर आहे. साई बाबांनी दिलेला श्रद्धा और सबूरी हा संदेश ही त्यांना आठवला नाही. राज्यभर रिपाइंच्या कार्यकर्त्यांनी आंदोलनं केली. बाळासाहेब विखे पाटलांचा पुतळा जाळला. रामदास आठवले यांनीही त्यांना राज्यसभेवर पाठवावे अशी मागणी केली.
त्यानंतर काही वेगळ्या बातम्याही आल्या. कार्यकर्त्यांच्या बैठकीमध्ये काँग्रेस बरोबरील युती तोडा अशी मागणी करण्यात आली. शिवसेने बरोबर जाण्यासही काही कार्यकर्त्यांचा आग्रह असल्याच्याही बातम्या प्रसिद्ध झाल्या. आता या बातम्या आहेत की काँग्रेसवर दबाव टाकण्याचे राजकारण या विषयी आत्ताच काही सांगता येणार नाही. मात्र यामुळे काही प्रश्न निर्माण झालेत. तर काही प्रश्नांची आपोआप उत्तरे मिळतील.
शिवसेनेनं हिंदूत्व सोडल्यास युती करता येईल, हे रामदास आठवले यांचं ब्रीद वाक्य यावेळीही त्यांनी व्यक्त केलं. मात्र मराठी माणूस आणि हिंदूत्व शिवसेनेचा आत्मा आणि श्वास असल्यानं हा मुद्दा आपोआपच निकाली निघतो. मात्र या मुद्यांच्या पलीकडेही काही सामाजिक प्रश्न आहेत. मराठवाडा विद्यापीठाच्या नामांतरास विरोध करणा-यांमध्ये काँग्रेसचे त्या भागातील नेते आघाडीवर होते, हा इतिहास अजूनही लोक विसरलेले नाहीत. विद्यापीठ नामांतराच्या मुद्यावर मराठवाड्यात मोठ्या प्रमाणात तणाव निर्माण झाला होता. शिवसेनेनंही हा मुद्दा उचलला होता. शरद पवार, छगन भुजबळ आणि रामदास आठवले यांनी मराठवाडा विद्यापीठाचे नामांतर केले नाही तर त्यांनी नामविस्तार केला. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनीच डॉ.बाबासाहेब आंबेडकर मराठवाडा विद्यापीठ हा नामविस्ताराचा तोडगा सुचवला होता. शिवसेनेच्या या भूमिकेमुळे मराठवाड्यात नामविस्तारानंतर शांतता नांदली.
शिवशक्ती आणि भीमशक्ती एकत्र आली तर राज्यात सत्ता परिवर्तन होणार यात कोणतीही शंका नाही. कारण शिवसेनेनं मराठ्यांचे राजकारण मोडीत काढून ओबीसींना सत्तेची चव चाखायला दिली. अर्थात शिवसेनेने जातीचे राजकारण न करता हे समाजकारण केले. हाच कित्ता शिवसेना पुन्हा गिरवू शकते. दलितांची मते वापरून त्यांना सत्तेपासून काँग्रेसने नेहमीच दूर ठेवलंय. मात्र शिवसेनेच्या मदतीने रिपाइं सत्तेत सहभागी होवू शकते. मायावतींचे सोशल इंजिनिअरींग शिवसेनेने कोणतीही घोषणा न देता केव्हाच अंमलात आणलंय. त्याला जर रिपाइंची जोड मिळाली तर राज्याचे राजकारण आणि समाजकारणही बदलेल.
शिवसेनेत जातीला थारा नसल्याने, या नव्या समीकरणामुळे ग्रामीण भागातही अमुलाग्र बदल होवू शकतील. काँग्रेसच्या राजवटीत सुरू असलेले दलितांवरील अन्याय दूर व्हायला मदत होवू शकेल. खैरलांजी सारख्या घटना टाळता येतील. दलित आणि सवर्णांमधील दरी कमी होवू शकेल.
अर्थात सध्या तरी या शक्यतेचा विचार करून हा लेख लिहण्यात आलाय. रामदास आठवले पुन्हा काँग्रेसच्या संगतीत जातात की 'ऐक बनो नेक बनो' हा साई बाबांचा संदेश आचरणात आणत स्वतंत्रपणे निवडणुका लढवतात हे लवकरच स्पष्ट होईल. मात्र शिवशक्ती आणि भीमशक्तीचा मिलाप हा सत्तेपेक्षा समाजकारणासाठी अधिक महत्वाचा होवू शकतो, हे ही तितकंच खरं.