Friday, December 24, 2010

जातीय राजकारणाचा काँग्रेसी विखार

पुणे महापालिकेत सत्ताधारी काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने दादोजी कोंडदेव यांचा पुतळा हलवण्याचा ठराव मंजूर केला. तर दुसरीकडे संभाजी ब्रिगेडने ठाण्यातल्या दादोजी कोंडदेव स्टेडियमवर होणारे साहित्य संमेलन उधळण्याची धमकी दिलीय. संभाजी ब्रिगेडसमोर काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस माना तुकवत असल्याचे यातून स्पष्ट होतेय.
आता इथं असा प्रश्न निर्माण होतो की, या संभाजी ब्रिगेडचा कशामुळे बाऊ केला जात असेल ? तर याचे उत्तर अत्यंत स्पष्ट आहे की, संभाजी ब्रिगेडला काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसची फूस आहे. त्यातही राष्ट्रवादी काँग्रेसचे या ब्रिगेडवर अधिक प्रेम आहे. विनायक मेटे यांच्या शिवसंग्राम या संघटनेचे अनधिकृत पितृत्वही राष्ट्रवादी काँग्रेसकडेच जात होते. आजही महाराष्ट्रात राष्ट्रवादी काँग्रेसची ओळख ही 'मराठ्यांचा पक्ष' अशीच आहे. मराठ्यांचा पक्ष म्हणवून घ्यायचे, छत्रपती शिवाजी महाराज, संभाजी महाराज यांचा वारसा सांगायचा आणि आपले जातीय राजकारण रेटायचे ही राष्ट्रवादी काँग्रेसची कार्यपद्धती आहे. जेम्स लेन प्रकरणावरून पुण्यातल्या भांडारकर इन्स्टिट्युटवर संभाजी ब्रिगेडच्या कार्यकर्त्यांनी हल्ला चढवला होता. त्यानंतर ही ब्रिगेड विशेषकरून नावारूपाला आली. यावेळीही राष्ट्रवादी काँग्रेसची ब्रिगेडला असलेली फूस लपून राहिली नव्हती.
काँग्रेस असो वा राष्ट्रवादी काँग्रेस यांना इतिहास किंवा शिवाजी महाराज यांच्याशी काहीही देणे-घेणे नाही. दादोजी कोंडदेव या प्रकरणावरून त्यांना फक्त राजकारण करायचे आहे. आदर्श सोसायटी घोटाळा, कॉमनवेल्थ घोटाळा, टू जी स्पेक्ट्रम घोटाळा, लवासाचा घोटाळा, वाढती महागाई, कांद्याची दरवाढ, पेट्रोल - डिझेलची दरवाढ, शेतक-यांच्या आत्महत्या, आदर्श प्रकरणावरून हायकोर्टाने सरकारवर मारलेले ताशेरे, सानंदा प्रकरणावरून विलासरावांवर सुप्रीम कोर्टाने मारलेले ताशेरे या सारख्या अनेक समस्या आणि प्रश्नांवरून नागरिकांचे लक्ष विचलीत करण्याचा हा सत्ताधा-यांचा डाव आहे.
जर संभाजी ब्रिगेडला इतकाच इतिहासाचा पुळका असेल तर मग आतापर्यंत त्यांनी औरंगाबाद या नावाचा कलंक हटवण्यासाठी एक तरी आंदोलन का केले नाही ? ज्या पापी औरंग्याने संभाजी महाराजांना हालाहाल करून मारून टाकले त्या औरंग्याचे नाव कशासाठी या भूमीत घेतले जात असेल ? 1987 साली शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांनी औरंगाबादचे नामांतर संभाजीनगर असे केले. मग अजूनही हे ब्रिगेडवाले औरंगाबाद हे नाव का घेतात ? सांगा कोण आहे तुमचा बाप संभाजी महाराज की औरंगजेब ? उस्मानाबादलाही धाराशिव असं नाव असताना कशामुळे सरकार हे नाव घ्यायला चाचरते ?
संभाजी ब्रिगेड या सरकारच्या पाठिंब्यावर चालत असलेल्या संघटनेने फक्त जातीय भूमिकेतून आणि काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसच्या इशा-यावर त्यांची कार्यपद्धती ठरवलेली आहे. तुमच्या ब्रिगेडच्या नावात संभाजी हे नाव आहे. किमान त्यांच्या नावावर तरी असे 'लांडे' राजकारण करू नका.

Saturday, December 18, 2010

राहुल बाबाचे बोबडे बोल


केंद्रीय गृहमंत्री पी. चिदंबरम यांनी वापरलेला 'भगवा दहशतवाद', दिग्विजय सिंह यांनी उधळेली 'हिंदू दहशतवाद' ही मुक्ताफळं, बॅ. ए. आर. अंतुले यांनी मुंबई हल्ल्यात शहीद झालेल्यांविषयी तोडलेले अकलेचे (चाँद) तारे हे काही अचानक घडलेले नव्हेत किंवा ती उत्सफूर्त प्रतिक्रिया नव्हती हे आता स्पष्ट झालंय. कारण काँग्रेसचे युवराज राहुल गांधींच्या धर्मनिरपेक्षतेचा बुरखा विकिलिक्सने जगासमोर टराटरा फाडला आहे. लष्कर ए तोयबापेक्षा हिंदू संघटना खतरनाक असल्याचं हे युवराज अमेरिकेचे राजदूत टिमोथी रोमर यांच्याबरोबर झालेल्या भेटीत बोलले होते. त्यामुळं चिदंबरम, दिग्विजय सिंह, बॅ. ए. आर. अंतुले यांचा बोलविता धनी हा युवराजच तर नसेलना ? अशी शंका उपस्थित होते.
राहुल गांधींचे तर काँग्रेसवाल्यांनी देशाचे भावी पंतप्रधान असं बारसं केव्हाच करून टाकलंय. त्याच्या बारशाच्या घुग-यांचा वासही या काँग्रेसच्या नेत्यांच्या तोंडातून येत असतो. मात्र आता हे युवराज असं काही बरळायला लागल्यावर काँग्रेसवाल्यांना मूग गिळून गप्प रहाण्याची वेळ आली आहे.
बरं हे भावी पंतप्रधान कधी महाराष्ट्रात येऊन शहिदांचा अपमान करतात, बिहारमध्ये जाऊन बिहारीच देशाचा विकास करत असल्याचं सांगतात, युवराजांचे खान दोस्त शाहरूख खानसाठी महाराष्ट्राचा पोलीस फाटा तैनात करतात अशी ही त्यांची कर्तबगारी आहे. मात्र या वेळी तर युवराजांनी हद्दच केली. पाकिस्तानसारख्या शत्रू राष्ट्राला उपयोग होईल, असे बोल या युवराजाने काढले. युवराजामुळे काँग्रेसची पार भंबेरी उडाली. मग सारवासारव करत सर्वच प्रकारचा दहशतवाद हा देशासाठी घातक असल्याचं युवराज म्हणाले.
धर्मनिरपेक्षतेचा आव आणणा-या या गांधी घराण्याने आता पर्यंत फक्त मुस्लिमांचा अनुनयच केलाय. आणि हेच सत्य पुन्हा एकदा प्रकाशात आले आहे.
युवराज आता चाळीशीत आहेत. सर्वसामान्य नागरिक चाळीशीत समजदार होतो. विवाह करून तो संसाराला लागलेला असतो. संसाराची जबाबदारी पार पाडत असतो. आपल्या मुलांना अंगखांद्यावर खेळवून त्यांच्यावर चांगले संस्कार करत असतो. अर्थात त्यासाठी योग्य वयात लग्न होणं गरजेचे असते. योग्य वयात लग्न झाले नाही तर काही लोक बावचळल्यासारखे वागू शकतात. अर्थात हे वाक्य सगळ्यांनाच लागू होतं असं नाही. त्यामुळं या वाक्याचा राहुल गांधीं बरोबर थेट संबंध कुणीही जोडू नये. प्लीज.
इथं कुणाच्या जाती - धर्माविषयीही मुद्दा उपस्थित करण्याची गरज नाही. कारण धर्म ही प्रत्येकाची वैयक्तीक बाब आहे. प्रत्येकाने आपला धर्म आपल्या घराच्या आत ठेवावा. मात्र जेव्हा काही नेते चूकीचे विधान करून शत्रू राष्ट्राला फायदा होईल असं वागत असतील तर काही प्रश्न उपस्थित होतात. म्हणूनच ते प्रश्न इथं विचारावे वाटतात. या युवराजांची मुंज झालीय का ? त्यांचा बाप्तिस्मा झालाय का ? किंवा त्यांची सुंता झालीय का ? जर यापैकी काही झालं असेल किंवा नसेल ही. तरी देशाला धोका पोहचेल असं विधान करू नये. तुमची बेगडी धर्मनिरपेक्षता, मतांचे राजकारण, धर्माचे राजकारण चूलीत घाला. आणि आता तरी देशधर्माचे पालन करा.