Friday, February 19, 2010

चला, एक पाऊल पुढे !

नोकरी, व्यवसाय सगळेच करतात. अर्थात काही जण काहीही न करता आनंदात जगू शकतात. मात्र नोकरी, व्यवसाय करताना आपल्या सगळ्यांनाच कामाचं समाधान मिळतं का ? अर्थात या प्रश्नाचं उत्तर देणं सगळ्यांनाच सोपं आहे किंवा नाही. अर्थात सगळेच याचं उत्तर कितपत खरं देतील हा ही मुद्दा आहेच. मात्र मी आज खरंच खुश आहे. काम करताना आपण टीम मध्ये काम करतो. त्यामुळे मी ज्या टीमचा भाग आहे, ती टीमही खुश आहे. कारण आज आम्हाला कामाचं समाधान मिळालं. आता यावर कुणी तरी (खवचट) म्हणू शकेल की, रोज कामाचं समाधान मिळत नाही का ? बरं हा प्रश्नही चूकीचा नाही. मात्र सगळेच दिवस सारखेच नसतात. रोजची परिस्थिती ही वेगळी असते. एक धागा सुखाचा शंभर धागे दु:खाचे असं जे म्हटलं जातं, ते सगळीकडेच लागू पडतं. मग त्याला नोकरीतरी कशी अपवाद असू शकेल.

आपण नोकरी का करतो ? त्याची उत्तरं पुढिल प्रमाणे देता येतील - करिअर करायचं आहे, आमच्या बापाने ईस्टेट कमवून ठेवली नाही, मला या क्षेत्रात उत्तुंग काम करायचं आहे. ही किंवा या प्रकारची उत्तरं आपल्याला मिळतील. मी ही नोकरी करतो. सर्व सहका-यांबरोबर जुळवून घेत नोकरी करतो. नोकरीत अनेकदा ताण-तणावाचे प्रसंग येतात. अडचणीचे प्रसंग येतात. अर्थात हे सगळ्यांच्या बाबतीत घडतं. मात्र आज जे घडलंय त्याचं श्रेय माझ्या संस्थेला, रिपोर्टरला आणि माझ्या सहका-यांनाच आहे. कारण आज मी त्यांच्यामुळेच खुश आहे. 1 जानेवारीपासून सुरू केलेला आमचा 'जरा हटके' हा कार्यक्रम बघताना आज डोळे पाणावले. पुण्यातला दिव्यांश खरे, यवतमाळची मोहिनी डगवार, परभणीचा योगेश खंदारे या अपंग विद्यार्थ्यांच्या संघर्षाची स्टोरी या कार्यक्रमात दाखवली. अपंगत्वाचा कोणताही न्यूनगंड न बाळगता हे विद्यार्थी ज्या ताठ कण्याने जीवन जगत आहेत, त्याला सलाम. जन्मत:च दोन हात आणि एक पाय नसतानाही क्रिकेट खेळणारा, वक्तृत्व आणि संगीत क्षेत्रातही कामगिरी बजावणारा दिव्यांश हा आत्महत्या करणा-यांच्या डोळ्यात अंजन घालण्यासाठी योग्य ठरावा. जीवन सुंदर आहे, असाच संदेश तो देतो. यवतमाळची मोहिनी डगवार हात नसताना सायकल चालवत महाविद्यालयात जाते. उच्च शिक्षणासाठी प्रयत्नरत राहून सनदी अधिकारी होण्याचं स्वप्न बाळगते. तसाच परभणी जिल्ह्यातल्या पूर्णाचा योगेश खंदारे अपघातानंतर दोन्ही हात गमावून पुन्हा नव्या उमेदीने जीवन जगतोय. नव्हे तर तो इतरांना जीवन कसं जगावं याचाच संदेश देतोय. उपचारादरम्यान हात कापावे लागलेल्या योगेशने पायाने लिहण्याची कला शिकून घेतली. मला दोन हात नाहीत. तरी मी आनंदाने जगतोय, अरे दोन हात असलेल्या विद्यार्थ्यांनो तुम्ही कशासाठी आत्महत्या करत आहात ? असा सवाल तो विचारतो.
जीवनात प्रत्येकालाच ताण-तणावांना सामोरं जावं लागतं. अर्थात हे ताण-तणाव, स्पर्धा नसेल तर आपलीच प्रगती खुंटेल. या ताण - तणावांचं योग्य व्यवस्थापन केलं तर सगळ्यांनाच जीवनाचा आनंद घेता येईल. जीवनाकडे सकारात्मकपणे पहा, सगळ्यांशी संवाद ठेवा, मनात सगळ्यांसाठी प्रेम बाळगा, कुणाविषयी वाईट बोलू नका, आणि मग बघा खरंच जीवन सुंदर आहे. यवतमाळची मोहिनी डगवार आणि परभणी जिल्ह्यातल्या पूर्णाचा योगेश खंदारे यांना मदतीची गरज आहे. त्यांच्यासाठी, त्यांना मदत करण्यासाठी खरंच एक पाऊल पुढे टाकण्याची गरज आहे. करालना त्यांना मदत ?

Friday, February 12, 2010

'धर्म'निरपेक्षताही अफूची गोळी

वरती केलेलं हे विधान कोणतंही सेवन न करता अक्कल हुशारीने केलेले विधान आहे. आणि हे विधान करण्यापूर्वी अर्थातच कार्ल मार्क्सच्या आत्म्याची क्षमा मागितलेली आहे. 'धर्म' ही अफूची गोळी असल्याचं जगानं मान्य केलं, हा इतिहास आहे. मात्र 'धर्म'निरपेक्षताही सुद्धा अफूचीच गोळी आहे, असा सिद्धांत प्रस्थापित होणार असल्याचं आपल्या देशातल्या घटना पाहिल्यानंतर स्पष्ट होतं. कारण आपल्या देशात धर्मनिरपेक्षतावाद्यांनी जितका धर्माचा (गैर)वापर केला आहे, तेवढा कोणीच केलेला नाही. शाहरूखला पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या प्रेमाचा उमाळा येऊनही धर्मनिरपेक्षतावाद्यांनी अजून तरी तोंड उघडलेले नाही. शिवसेना वगळता कोणत्याच पक्षाला यात काहीच वावगं दिसत नाही. पाकिस्तानच्या क्रिकेटपटूंसाठी शाहरूखचा जीव तुटतोय. मात्र आपण काही चूक केली असं त्याला वाटत नाही.
मुख्यमंत्री की 'खान'सामा
प्रियंका, राहुल यांचा यार असलेल्या 'खान'दोस्त साठी काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागली होती. एक तर गांधी कुटुंबियांचा यार आणि त्यातच मुसलमान म्हटल्यावर काँग्रेसची प्रतिष्ठा पणाला लागणं सहाजिकच होतं. त्यामुळे गांधी घराण्याच्या धर्मनिरपेक्षतेची 'चव' बिघडू नये यासाठी राज्याचे मुख्यमंत्री म्हणा किंवा 'खान'सामा म्हणा कामाला लागले. खानाच्या चित्रपटाला सुरक्षा देण्यासाठी चित्रपटगृहांना पोलीस संरक्षणाचा गराडा पडला. दिल्लीश्वर गांधींना खुश करण्यासाठी खानाच्या चित्रपटाला विरोध करणा-या शिवसैनिकांवर पोलीस तुटून पडले. अर्थात पोलीस बिचारे तरी काय करणार ? मुंबईवर हल्ला होतो, हेडली दोन वर्ष इथं राहतो, हे त्यांना कळत नाही. मात्र या निमीत्ताने का होईना निशस्त्र शिवसैनिकांवर दांडके आपटून तेवढीच सरकारी मर्दूमकी बजावल्याचं त्यांना समाधान मिळालं. मुख्यमंत्र्यांनी या निमीत्ताने खानाचे 'जोडे' उचलून एक वर्तूळ पूर्ण केलं. अर्थात महाराष्ट्रात राज्य करायचे असेल तर काँग्रेसवाल्यांना गांधी आणि खानांचे जोडे उचलावेच लागणार हे पुन्हा एकदा स्पष्ट झालं.
छत्रपती शिवाजी महाराज आम्हाला क्षमा करा
स्वराज्याच्या मुळावर आलेल्या अफजल खानाचा याच राज्यात शिवाजी महाराजांनी कोथळा काढला होता, हा इतिहास आहे. मात्र इथे तर देशाच्या अस्मितेवर चालून आलेल्या खानासाठी पायघड्या टाकण्यात येत आहेत. स्वराज्यावर चालून आलेला अफजल खान आणि अस्मितेवर चालून आलेला शाहरूख खान यांच्यात फरक तो काय ? या खानांमध्ये काय फरक आहे ? तो स्पष्ट दिसतोच आहे. मात्र ही असली खानावळ मोडून काढण्यासाठी राज्यकर्त्यांमध्ये ताकद असायला हवी. छत्रपती शिवाजी महाराजांनी स्वराज्यावर चालून आलेल्या अफजल खानाचा कोथळा काढून, त्याची कबर बांधली. ( नंतर धर्मांध मुस्लिमांनी ट्रस्ट स्थापून त्याचे उदात्तीकरण केले. अर्थात काँग्रेसने अजूनही कबरीला संरक्षण देऊन त्यांचा 'हात' कुणाबरोबर आहे, हे दाखवून दिलं. ) मात्र इथे तर पाकिस्तान प्रेमाचा उमाळा आलेल्या शाहरूखच्या चित्रपटाला विरोध करणा-यांची डोकी फोडण्यात आली. शिवाजी महाराज आम्हाला क्षमा करा. कारण आता राज्य हे स्वाभिमानाने नव्हे तर लाचारीने आणि अल्पसंख्यकांच्या मताने चालवण्याचे दिवस आले आहेत.
त्यांची धर्मनिरपेक्षता आमच्या धर्माचे काय ?
धर्मनिरपेक्षता नव्हे तर वॉट बँक जपण्यासाठी काँग्रेस कोणत्याही थराला जावू शकते यात शंका नाही. देशाविषयी गरळ ओकणा-यांची थुंकी ही त्यांना गोड आहे. काँग्रेस असो वा कोणतेही राजकीय पक्ष यांना सत्ता जपायची आहे. किंवा सत्तेत यायचं आहे. त्यासाठी त्यांना गरज आहे ती मुस्लीम वोट बँकेची. त्यासाठी मुस्लीमांना वाईट वाटू नये, याच एकसुत्री कलमाचे पालन ते करत असतात. शाहरूख असो अथवा कुणी इतर अल्पसंख्यांक यांच्या चूकीच्या वक्तव्याचा किंवा कृतीचा ते कधीच निषेध करणार नाहीत. त्यांच्यावर ते कधीच नेम धरणार नाहीत. अर्थात हे शिवधनुष्य पुचाट काँग्रेसवाल्यांना पेलणंही शक्य नाही. त्यामुळे अशा अस्मितेच्या प्रश्नांवर डोकी फोडून घ्यायची असतील तर स्वराज्याची पताका फडकावणा-या शिवाजी महाराजांचे वारसदारच पुढे येणार. त्यांच्या शिवाय कुणात आहे हा दम ?

खमंग फोडणी - लादेन नंतर जगातला दुस-या क्रमांकाचा लोकप्रिय मुसलमान, असं स्वत:ला म्हणवून घेणारा शाहरूख काँग्रेसला कशासाठी प्रिय असेल ? तर तो लोकप्रिय स्टार आणि मुस्लिम असल्यामुळेच. मात्र शाहरूखनेही काँग्रेसवर विश्वास ठेवण्याच्या आधी अमिताभ बच्चनचा किस्सा लक्षात ठेवावा. अमिताभ बच्चनच्या लोकप्रियतेचा निवडणुकीत काँग्रेसने फायदा उठवला. आणि नंतर त्याच अमिताभला 'बोफोर्स'च्या तोंडी दिलं. आज उदोउदो करणारे हेच काँग्रेसवाले उद्या त्याला कशाच्या तोंडी देतील याचा 'नेम' नाही.

Friday, February 5, 2010

राहुल गांधी ! महाराष्ट्र धर्म तुडवावा

अखरे राहुल गांधी यांची मुंबई भेट पार पडली. या भेटीचं नियोजन अगदी योग्य प्रकारे करण्यात आलं होतं. नुसतंच नियोजन नव्हे तर या भेटीसाठी वातावरण निर्मितीही करण्यात आली होती. मुंबईत येण्याआधीच राहुल गांधी यांनी बिहार - युपीच्या भैय्यांनी मुंबईचं रक्षण केलं असं वक्तव्य बिहारमध्ये केलं. अर्थातच हे वक्तव्य मराठी जनतेला डिवचण्यासाठी होतं. अर्थात शिवसेना वगळता इतर मराठी मंडळी शांतच राहिली. मात्र शिवसेनेनं राहुल गांधी यांना काळे झेंडे दाखवून निषेध व्यक्त करण्याचा निर्णय घेतला. राहुल गांधींनी एकाच वेळी युपी - बिहारी भैय्यांना खुश करून उत्तर भारतीय वोट बँक आणखी मजबूत करत, बिहारमध्येही तिचा उपयोग करून घेण्याची चाल यशस्वीपणे खेळली. इतकंच नव्हे तर घाटकोपरला रमाबाई आंबेडकर नगरमध्ये जाऊन आपली हक्काची दलित वोट बँकही जपण्याचा प्रयत्न केल्याचं दिसून येतं.
बरं हे राहुल बाबा मुंबईचा दौरा ठरल्याप्रमाणे करता अवखळ बाळाप्रमाणे कुठेही कसेही फिरलं. आता या राहुल 'भैय्या'ला खरोखरच लोकलने फिरायचं होतं की शिवसेनेच्या आंदोलनामुळे मार्ग बदलावा लागला हा प्रश्न येथे निर्माण होतो. इकडे राहुल बाबाचा लोकलमध्ये प्रवास सुरू होता. आणि तिकडे राज्याचे मुख्यमंत्री अशोकराव चव्हाण यांना घाम फुटला होता. कारण शिवसैनिकांचे 'झेंडा' आंदोलन चिघळलं तर कसाब कृपेने मिळालेले मुख्यमंत्रीपद जाण्याचाही धोका निर्माण झाला होता. मात्र सरकारने शिवसेनेच्या आंदोलनाची गंभीर दखल घेतली होती. जणू शिवसैनिक काळे झेंडे नव्हे तर धोंडेच बरसवणार होते की काय ? असा सरकारचा समज झाला होता. मग त्यासाठी पूर्ण मुंबईत कडेकोट सुरक्षा व्यवस्था लावण्यात आली. या निमीत्ताने सुरक्षा व्यवस्था काय असते हे ही 'आम आदमी'ला कधी नव्हे ते दिसून आलं. अशोकराव आता एक करा तुमच्या सरकारचं किमान अस्तित्व जनतेला जाणावं यासाठी तरी ही सुरक्षा व्यवस्था कायम ठेवाच.
बरं आता आपण पुन्हा वळू यात राहुल गांधींच्या दौ-याकडे. राहुल गांधींनी केलेला लोकल प्रवास हा खुद्द त्यांच्यासाठी फार काही नवलाचा विषय नसेल. कारण राहुल गांधी मागील अनेक दिवसापासून देश जाणून घेण्यासाठी देशभर फिरत आहेत. दूरवरच्या गावात मुक्काम करत आहेत. गरिबाच्या घरी जेवण करत आहेत. आता त्यांना अजून किती देश जाणता आला ते काही कळायला मार्ग नाही. मात्र त्यांनी लोकलमध्ये प्रवास करणं यात काही वेगळं नाही. कारण असे 'गांधी छाप' आंदोलन ही गांधी - नेहरू घराण्याची मिरासदारीच आहे. सोनिया गांधीही अनेकदा अशाच ' आम आदमी 'बरोबर संवाद साधत असतात. राहुलही, सोनियाजी आता बस कराही नाटकं. वाढत्या महागाईमुळे 'आम आदमी'चं पोट खपाटाला गेलं आहे. त्यासाठी काय करणार आहात ते सांगा ? आणि त्यानंतर ही नौटंकी करा.
राहुल गांधींच्या मुंबई भेटीमुळे अशोक चव्हाण यांच्या वडिल शंकरराव चव्हाण यांचा जोडे उचलण्याचा वारसा त्यांच्या चिरंजीव अशोक चव्हाण यांच्या मंत्रीमंडळाने सुरू ठेवल्याचंही स्पष्ट झालं आहे. गृहराज्यमंत्री रमेश बागवे यांनी राहुल गांधी यांचे जोडे मस्तकावर ठेवून महाराष्ट्राची मान पुन्हा उंचावली आहे. अरे थू तुमच्या जिंदगानीवर. छत्रपती शिवाजी महाराजांनी आग्रा येथे मागील रांगेत औरंगजेबाने मागे उभं केल्यावर तिथं न थांबण्याचा निर्णय घेतला होता. मात्र आज त्याच स्वाभिमानी शिवाजी महाराजांच्या स्वराज्यात ही कणा नसलेली जात निर्माण झाली आहे. दिल्लीश्वरांचे पाय चाटणे हीच काय त्यांची कर्तबगारी.
या निमीत्ताने इंग्रजी आणि हिंदी मीडिया हा विकला गेला आहे की काय ? किंवा मुंबई तोडण्याच्या कटात तेही सामील झाले आहेत ? अशी शंका उपस्थित होते. काळे झेंडे दाखवण्याचे साधे आंदोलन असताना त्याला ठाकरे आणि गांधी युद्धाचं स्वरूप देऊन, थेट राहुल गांधी यांना विजेता ठरवण्यात आलं. या इंग्रजी - हिंदी चॅनेल्सची मळमळ या निमीत्ताने बाहेर पडली. त्यांना मराठी माणूस, शिवसेना यांच्यावरचा द्वेषही दिसून आला. हे इंग्रजी - हिंदी चॅनेल्स कमी होते की काय, म्हणून मराठीतले बाटगे 'लोकमळ'ने ही त्याचा कंडू या निमीत्ताने शमवून घेतला. मात्र या निमीत्ताने मराठीचा अपमान झाल्यावर रस्त्यावर कोण उतरतं आणि कोण अपमान करणा-यांचं स्वागत करतं हे सिद्ध झालं. राहुल गांधींनी भाईदास हॉलमध्ये मुंबईचा उल्लेख बॉम्बे असा केला. आता तरी काँग्रेसवाले जागचे हलणार आहेत का ?

खमंग फोडणी - आता पुढच्या आठवड्यात शाहरूख खानचा 'माय नेम इज खान' प्रदर्शित होणार आहे. या खानाचे गांधींबरोबर चांगलेच सूत जमलेले आहे. त्यामुळे दिल्लीश्वरांच्या आशिर्वादामुळे पाकिस्तानी क्रिकेटपटूंच्या प्रेमात पडलेल्या या खानाने अजूनही माफी मागितलेली नाही. त्यामुळे या खानासाठी पुढिल आठवड्यात पुन्हा एकदा काँग्रेसी बाटगे त्यांची प्रतिष्ठा पणाला लावणार आहेत. मराठी माणसाच्या अपमानानंतर शिवसेना रस्त्यावर उतरली. आता तर राष्ट्राचा अपमान या खानाने केलाय. त्यामुळे त्याचा मोठा सत्कार व्हायला हवा. त्याचा सिनेमा प्रदर्शित करण्यासाठी सैन्याला बोलवावं लागलं तरी बेहत्तर मात्र धर्मनिरपेक्षता आणि हा मुजोर खान सुरक्षीत राहिली पाहिजे. या विरोधात कोणीही बोलू नका नाही तर तुम्ही जातीयवादी ठराल. जय हो. जय हो. जय हो.