Wednesday, August 26, 2009

वाहिन्यांचा वाह्यातपणा

सोनी वाहिनीवर प्रसारित होणा-या 'इस जंगल से मुझे बचाओ' या कार्यक्रमाचा सोमवारी (24/08/09) रात्री साडे सात वाजता एक भाग दाखवण्यात आला. हा भाग 15 ऑगस्ट रोजी प्रसारित करण्यात आला होता. स्वातंत्र्य दिनानिमीत्त दाखवलेल्या या भागात सहभागी झालेल्या कलाकारांनी स्वातंत्र्याविषयी त्यांची मतं व्यक्त केली. देशाला मिळालेल्या स्वातंत्र्याचा आनंद त्यांनी अंगावरील कपडे काढत व्यक्त केला. कपडे काढणं हे ही स्वातंत्र्य असल्याचे मौलिक विचारही त्यांनी मांडले. एकंदरीत या कार्यक्रमातील कलाकारांचे संवाद हे बीपच्या रूपातच ऐकू येतात. त्यामुळे त्यांचा दर्जा काय असतो, हे वेगळं सांगण्याची गरज नाही. अगदी झोपडपट्टी टाईप शिव्या देणारे कलाकार आणि त्यांचे कपडे बघून जंगलातील प्राण्यांवर इस प्रोग्रामसे हमे बचाव असं म्हणण्याची वेळ येवू नये म्हणजे मिळवलं. यात सहभागी झालेल्या महिला कलाकारांना काही अभिनयाचे अंग असेल असं जाणवत नाही. त्यामुळे या कलाकार आहे तेच 'अंग' अभिनय म्हणून सादर करत असाव्यात. असो.
दुसरा एक हिट प्रोग्राम म्हणजे स्टार प्लस वरील 'सच का सामना'. या कार्यक्रमावरून तर संसदेतही गदारोळ झाला होता. भारतीय संस्कृतीला हा कार्यक्रम शोभणारा नाही, अशी एकसूरात सर्व पक्षीय खासदारांनी तक्रार केली होती. तर दूरचित्रवाणीवरील कलाकारांनी खासदार संसदेत गोंधळ घालतात, काही खासदार हे गुन्हेगार आहेत अशा शब्दात त्यांच्यावर पलटवार केला होता. या वेळी 'दिवार' चित्रपटातला 'भाई तूम साईन करोगे या नहीं' हा सीन डोळ्यासमोर उभा राहतो. अमिताभ आणि शशी कपूर मधील या संवादाचा शेवट निरूपा रॉयच्या संवादाने होतो. तो संवाद म्हणजे 'दुसरों के पाप गिननेसे तूम्हारे अपने पाप कम नहीं होते,' या कलाकार आणि खासदारांधील वादावर ही मात्रा योग्य ठरते, नाही का? 'सच का सामना' हा कार्यक्रम रात्री उशिरा दाखवला जातो, तेव्हा मुले झोपतात असा दावाही कलाकारांकडून करण्यात आला. त्यांची स्वत:ची मुले तरी रात्री अकराच्या आधी कधी झोपतात का? हे त्यांनी सांगायला हवं. एकंदरीतच या कार्यक्रमाचे स्वरूप, त्यात विचारले जाणारे प्रश्न अत्यंत व्यक्तीगत स्वरूपाचे असतात. तरीही हा कार्यक्रम का बघितला जात असावा. तर त्यामागे आहे ती मूळ मानवी प्रवृत्ती. आणि तिचं सार एका म्हणीत सांगता येईल ते म्हणजे, 'आपलं ठेवायचं झाकून अन....'
एनडीटीव्ही इमॅजिनच्या 'राखी का स्वयंवर' या कार्यक्रमानेही अशीच राळ उडवून टीआरपी पदरात पाडून घेतली. ( वादाचा दुसरा पदर तो असा. ) यातून या वाहिन्यांची दुटप्पी भूमिका अधोरेखीत होते. एकाच ग्रुपच्या या वाहिन्या असतात. त्यातील मनोरंजन वाहिनी ही वाद निर्माण करणारे कार्यक्रम तयार करून प्रसिद्धी आणि टीआरपी मिळवते. त्यानंतर याच ग्रुपमधील दुसरी बातम्यांची वाहिनी ( न्यूज चॅनेल ) त्या कार्यक्रमासंबंधीच्या बातम्या आणि चर्चात्मक कार्यक्रम सादर करून टीआरपी म्हणजेच जाहिरातींचा मलिदा मिळवते. म्हणजे 'चित भी मेरी और पट भी मेरी' असा हा प्रकार. आणि पुन्हा अभिव्यक्ती स्वातंत्र्याच्या नावाखाली त्यांचीच टिमकीही जोरात वाजवली जाते.
'बालिका वधू' मालिकेवरूनही संसदेत मोठा गदारोळ झाला होता. या मालिकेने तर आधूनिक 21 व्या शतकाचा वध केला असं म्हटलं तरी अतिशयोक्ती ठरू नये. कलर्स वाहिनी सुरू झाली तेव्हा या मालिकेने चांगलेच रंग उधळले होते. मात्र त्यांनी आता उधळलेले हे गुण आचंबित करणारे आहेत. या वाहिनीनेही मालिका + वाद = टीआरपी, हे गणित चांगल्या प्रकारे जुळवून आणल्याचं दिसून येतं.
आता अभिव्यक्ती स्वातंत्र्यांच्या नावाखाली वाहिन्यांचा वाह्यातपणा कितपत खपवून घ्यायचा यालाही मर्यादा असायला हवी. मात्र शेवटी काय तर 'ठेविले चॅनेल तैसेची रहावे, हाती असू द्यावा रिमोट' असं म्हणायचं आणि शांत बसायचं. कारण आता दर्शकांच्या हाती दुसरा कोणताही पर्याय राहिलेला नाही.

खमंग फोडणी - रिएलिटी शो सादर करणा-या या वाहिन्यांसाठी एक छान संकल्पना आहे. जास्त दूर नाही मुंबईतच ( या वाहिन्यांची ऑफिसेस येथे आहेत यासाठी ) लोकल्समध्ये गाणे गावून मिळणा-या पैश्यातून अनेक जण उपजिविका भागवतात. 'शिर्डी वाले साई बाबां', 'केशवा माधवा', 'बहारो फुल बरसावो' या प्रकारची अनेक गाणी ते सादर करतात. यातील पंधरा ते वीस गायक - गायिका निवडून त्यांच्या गायनाचा रिएलिटी शो सादर करा. त्यावर एसएमएस मागवा. आणि होवून जाऊ द्या एक मोठा ग्रँड फिनाले. काय म्हणता चॅनेल्सवाले, है क्या दम ?

Monday, August 24, 2009

दोघात तिसरा, सगळं विसरा

राज्यात अखेर 'रिपब्लिकन डावी लोकशाही समिती' स्थापन झाली. विधानसभेच्या 288 जागा लढविण्याचा निर्णयही या समितीने घेतला. जागावाटपाविषयी अजून तरी समितीचा निर्णय झालेला नाही.
दुष्काळ, महागाई, भारनियमन, दलित अत्याचार, सच्चर समितीच्या अहवालाची अंमलबजावणी या विषयांवर ही समिती मते मागणार आहे. सुमारे वीस पक्ष आणि संघटना यांना समितीच्या झेंड्याखाली एकत्रित आलेत. आता निवडणूक लढवेपर्यंत जरी हे सर्व एकत्रित राहिले तरी ते त्यांचे मोठे यश म्हणावे लागेल. या समितीमध्ये आता अकरा आमदार आणि खासदार असल्याने त्यांची ताकदही निश्चीतच वाढलेली आहे.
राज्यात काँग्रेस - राष्ट्रवादी काँग्रेसची आघाडी, शिवसेना - भाजप युती यांना सक्षम पर्याय द्यायला ही समिती कागदावर तरी बलाढ्य दिसत आहे. अर्थात अनेकदा भारतीय क्रिकेट संघही कागदावर बलाढ्यच असायचा आणि निकाल काय यायचा हे सगळ्यांच्या लक्षात आहेच. मात्र प्रथमदर्शनी पाहता काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसला तडाखा बसणार हे निश्चीत. अर्थात मागील दहा वर्षात रिपाइंसुद्धा श्रद्धा आणि सबुरी या वचनाला जागत आघाडी सरकारमध्ये सहभागी होवून, जे काही एखादं फुटकळ मंत्रीपद मिळेल त्यात समाधानी होती. एखादं मंत्रीपद मिळालं म्हणजे सामाजिक न्यायाचं तत्व साधलं गेलं असा रिपाइं नेत्यांचाही समज होता. मात्र शिर्डीत रामदास आठवलेंचा पराभव झाला आणि 'एक बनो नेक बनो' हा नारा देत रिपाइं ऐक्याची साद घातली गेली. अनेक दलित नेते एकत्र आले. प्रितमकुमार शेगांवकर त्यांचे मंत्रीपद कायम ठेवत ऐक्य करताहेत. तर केरळचे राज्यपाल असलेलेल रा.सु.गवईंचे पुत्रही ऐक्यात सामील आहेत. काँग्रेसला विरोधही करायचा मात्र मंत्री आणि राज्यपालपद सोडायचं नाही असा त्यांचा ऐक्यवाद आहे. मात्र गवई यांनी काँग्रेसला विरोध करण्याची हिंमत केली हीच मोठी बाब म्हणावी लागेल. कारण गवईंचे राजकारण काँग्रेसच्या कलानेच इथपर्यंत पोहोचलं आहे. इतकंच नव्हे तर अमरावतीमध्ये गवई ज्या भागात राहतात त्या भागाचे नावही काँग्रेसनगर असं आहे, आता बोला.
मात्र शिर्डीतला रामदास आठवले आणि अमरावतीमधला राजेंद्र गवई यांचा पराभव रिपाइं जनतेच्या म्हणण्यापेक्षा नेत्यांच्या जिव्हारी लागला. आणि या पराभवाने नेत्यांना ऐक्याची आठवण आली. रिपाइं नेते काँग्रेसच्या नादी लागल्याने आंबेडकरी जनतेला फक्त पंजा आणि या दहा वर्षात घड्याळ हेच चिन्ह परिचयाचे झाले. एकेकाळी रिपाइंचे निवडणूक चिन्ह असलेला हत्ती बसपने केव्हाच पळवला. बसपचा हत्ती दमदार पाऊले टाकत उत्तर प्रदेशमध्ये सत्तेत आरूढ झाला. तर महाराष्ट्रात रिपाइं एक किंवा दोन मंत्रीपदा पुरती राहिली. त्यामुळे आता कधी नव्हे ते रिपाइं नेत्यांना त्यांच्या स्वत:च्या निवडणूक चिन्हासह जनतेसमोर मते मागण्याची संधी प्राप्त झालीय. यामुळे रिपाइं आणि तिस-या आघाडीची राज्यातील ताकदही कळेल. आणि या ताकदीमुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेस सत्तेत पोहोचत होती हे ही लक्षात येईल. रिपाइंला वोट बँक म्हणून पाहणा-या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांची आता बोबडी वळणार हे नक्की. मराठवाडा आणि विदर्भात मोठ्या प्रमाणात असलेली आंबेडकरी मतं 'रिपब्लिकन डावी लोकशाही समिती' च्या माध्यमातून त्यांचा रोष प्रकट करणार हे नक्की. यामुळे काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या अनेक विद्यमान आमदार आणि मंत्रीपदांना घरी बसावं लागणार आहे. त्यामुळे धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन नको, हे ब्रीद वाक्य घेवून काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते आता रिपाइंचा धावा करायला लागल्याचं दिसून येत आहे.
आघाडी नंतरचा राज्यातील दुसरा पर्याय असलेल्या शिवसेना भाजपला अव्वल नंबरवर जाण्याची आयतीच संधी मिळाली आहे. कारण तिसरी आघाडी जितकी प्रबळ होईल तितकी ती काँग्रेस आघाडीची मते खाणार हे नक्की. तसंच काँग्रेसचा वाढलेला आत्मविश्वास आणि स्वबळावर लढण्याची भाषा त्यांना राष्ट्रवादी पासून दूर नेत आहे. याचाही निवडणुकीत विपरीत परिणाम होवू शकतो. काँग्रेसला राष्ट्रवादीची तितकीशी गरज राहिलेली नसल्याने निवडणुकीत त्यांचे टीमवर्क दिसेल याची शाश्वती आता राहिलेली नाही. त्यामुळे या निवडणुकीत युतीला चांगली संधी आहे. मात्र राजकारणात दोन अधिक दोन पाच होतीलच याची खात्री नसते.त्यामुळे या राजकीय गलबलात मतदार कोणता कौल देतात, यावरच पुढिल चित्र स्पष्ट होईल.

खमंग फोडणी - काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसमधील धुसफूस, सत्ता प्राप्त करण्यासाठी आंदोलनांची राळ उडवत पुढे सरसावलेली शिवसेना आणि पक्षांतर्गत वादाने जर्जर झालेली भाजप या पक्षांभोवती राजकारण केंद्रीत झाले होते. मात्र आता आघाडी आणि युती या दोघांमध्ये तिसरा आल्याने सगळेच संदर्भत बदललेत. आघाडीची हक्काची वोट बँक फुटण्याची वेळ आलीय. तर युतीला ही लॉटरी लागण्याची शक्यता निर्माण झालीय. परिणामी हा तिसरा आता कुणाच्या मुळावर येतो हे पाहणं आता रंजक ठरणार आहे.