Sunday, April 19, 2009

40 टक्क्यांची लोकशाही आणि कँडल क्रांतीवीर

15 व्या लोकसभेसाठी राज्यात सरासरी 50 टक्के मतदान झालं तर मुंबईत ते अवघं 40 टक्क्याच्या जवळपास फिरकलं. राजकीय पक्ष मोठ्या त्वेषाने प्रचार सभा घेत होते. मात्र सामान्य मतदार त्यात सहभागी होताना दिसले नाही. अर्थात निवडणुकीचा उत्साह दिसला तो वृत्तपत्रे आणि वृत्तवाहिन्यांमध्ये. शेवटी निवडणुकीच्या बातम्या दिल्या नाही तर, मग त्यांना तरी जाहिराती कुठून मिळणार नाही का ?

बरं सामान्य नागरिकांनी निवडणुकीत, मतदानात सहभागी व्हावं यासाठी असे प्रचाराचे मुद्दे तरी या निवडणुकीत होते कुठे? राज ठाकरे यांनी सांगितल्याप्रमाणे 60 वर्षापासून प्रत्येक निवडणुकीत सारखीच आश्वासने देण्यात येत आहेत. पाणी,वीज,रस्ते या मुलभूत सुविधा सुद्धा जर नागरिकांना उपलब्ध करून देता येत नसतील तर हे राजकारणी कोणत्या थोबाडाने मते मागायला येतात, हे ही तपासायला हवे.

मुंबईवर हल्ला झाल्यानंतर येथिल इंग्रजाळलेला वर्ग रस्त्यावर आला. ( सामान्य नागरिक नेहमीच रस्त्यावर असल्याने त्याला याचे नवल वाटले नाही.) त्यांनी ताज समोर मेणबत्त्या लावल्या. कँडल लाईट डिनर घेणारे, कँडल घेवून एकत्रित आले. कोणतेही आवाहन न करता मोठी गर्दी जमली. तमाम वाहिन्यांना जणू ही नवी ही क्रांती असल्याचाच तेव्हा भास झाला. विशेषत: इंग्रजी वृत्तवाहिन्या यात आघाडीवर होत्या. वृत्तपत्रांनीही यावर रकानेच्या रकाने भरले. सरकार आणि राजकारण्यांवर हे कँडल क्रांतीवीर तुटून पडले. चॅनेल्सच्या बुम आणि कॅमे-यासमोर त्यांनी फाड फाड इंग्रजीमध्ये राजकारण्यांना तासून काढले. याचाच परिणाम म्हणून की काय विलासराव देशमुख आणि आर.आर.पाटील यांनी खुर्ची सोडावी लागली. कँडल क्रांतीवीरांचा हा रोष निवडणुकीत व्यक्त होणार अशी सर्वसामान्यांना अपेक्षा होती. मात्र तसं घडलं नाही. या श्रीमंत वर्गाच्या चोचले पुरवण्याच्या ठिकाणावर दहशतवाद्यांचा हल्ला झाल्याने हे चिडले होते. ताज सर्वसामान्यांसाठी दुरून बघण्याचे ठिकाण असले तरी श्रीमंतांच्या ऐश्वर्याचा दर्प तेथे असतो. आणि त्यावरच दहशतवाद्यांनी हल्ला केल्याने त्यांच्या या श्रीमंत अस्मितेला धक्का पोचल्याने हे कँडल क्रांतीवीर रस्त्यावर आले होते.
जागतिक आणि पुढारलेले शहर म्हणवल्या जाणा-या या शहराची मतदानातील ही अनास्था लोकशाहीसाठी गंभीर बाब ठरणारी आहे. नागरिकांची ही अनास्था राजकीय नेते आणि पक्षांच्या पथ्यावर पडणारी आहे. जनताच जर जाब विचारणार नसेल तर राजकारण्यांवर मतदारांचा अंकुश राहणार नाही. मतदानासाठी बाहेर पडला तो हातावर पोट असणारा कनिष्ठ मध्यमवर्ग. श्रीमंत आणि उच्च मध्यमवर्गाने सलग चार दिवसाची सुट्टी साधत थंड हवेच्या ठिकाणी जाणे पसंत केले. उन्हाच्या धारेत उभा राहिला तो 40 टक्के सामान्य मतदार. हाच मतदार या लोकशाहीचा कणा आहे. या 40 टक्के मतदारांमुळे लोकशाहीचा डोलारा उभा आहे. मात्र सरकारी धोरणे ठरवताना त्याचा कितपत विचार केला जातो, हे ही आता तपासायला हवे. देशातील ही लोकशाही टिकवायची असेल तर कँडल क्रांतीवीरांना बाजूला सारून सामान्य मतदाराच्याच हिताचा आता विचार व्हायला हवा.

Wednesday, April 8, 2009

गावस्कर आणि शाहरूख

काळ हा नेहमीच गतीमान राहीलाय. दर दहा वर्षांनी एक पिढी बदलते. त्याच बरोबर त्या पिढीचे आदर्श, आवडीनिवडीही बदलतात. एके काळी कसोटी क्रिकेटला असलेली लोकप्रियता ही काळाच्या ओघात कमी होत गेली. त्यामुळे एकदिवसीय क्रिकेटला तुफान लोकप्रियता मिळाली. एकदिवसीय क्रिकेट सामने सुमारे 35 वर्षापासून लोकप्रियतेच्या शिखरावर आहेत. मात्र फुटबॉल, टेनिसचे सामने हे दोन तासात निकाली लागत असल्याने त्यांचाही मोठा चाहतावर्ग जगभर पसरलेला आहे. झटपट निकाल लावण्याचे हे सुत्र लक्षात ठेवून 20-20 क्रिकेटचा जन्म झाला. त्याचा विश्वचषकही झाला, तो भारताने जिंकलाही. त्यामुळे ही लोकप्रियता आणि त्यातून मिळणारा पैसा डोळ्यासमोर ठेवून इंडियन प्रिमीअर लीगचा जन्म झाला. त्यातून पहिली आयपीएल स्पर्धाही भरवली गेली. या स्पर्धेला तुफान प्रतिसाद मिळाला.
आयपीएलचे क्रिकेट संघ हे उद्योगपती आणि अभिनेत्यांनी विकत घेतले. त्यात शाहरूख खानचाही समावेश आहे. त्याने कोलकाता नाईट रायडर्स हा संघ विकत घेतला. या संघाचा कोच जॉन बुकनन याने संघासाठी मांडलेल्या एका पेक्षा अधिक कर्णधाराच्या विचारावर सुनील गावस्कर यांनी टीका केली. आणि किंग खान भडकला. संघ मी विकत घेतलाय त्यामुळे तो माझ्या मर्जी प्रमाणे वागवणार अशी किंग भूमिका शाहरूखने घेतली. अर्थात त्याचे तरी काय चुकले म्हणा? पैसा फेक तमाशा देख, असा हा सरळ हिशोब. शाहरूखच्या बोलण्याचे क्रिकेट रसिकांनी वाईट वाटून घेवू नये. आता क्रिकेटचा बाजार मांडलाच आहे, तर यात किंग मालकाला बोलणार तरी कोण ?
सुनील गावस्कर यांनी 20-20 क्रिकेट खेळलेले नाही, त्यामुळे त्यांनी यावर बोलू नये. त्यांना माझी संकल्पना योग्य वाटत नसेल तर त्यांनीही एखादा संघ खरेदी करावा आणि तो चालवावा, या भाषेत शाहरूखने हिशेब चुकता केला. आता लोकशाही असल्याने कुणी काय म्हणावे याला अटकाव करता येणार नाही. मात्र शाहरूखला समोरची व्यक्ती कोण आहे, याचा बहुतेक पैश्यामुळे विसर पडला असेल. क्रिकेटमध्ये देशाला प्रतिष्ठा मिळवून देण्याचं काम सुनील गावस्कर यांनी केलंय.
शाहरूखच्या म्हणण्याप्रमाणे वागल्यास कोणतीही व्यक्ती त्याचे क्षेत्र सोडून इतर विषयावर बोलू शकणार नाही. हॉकीपटूने क्रिकेट किंवा फुटबॉलवर तोंड उघडण्याचा प्रसंगच येणार नाही. टेनिसपटू बॅडमिंटनवर बोलणार नाही. डॉक्टर पत्रकारांविषयी बोलणार नाही, अर्थात ही यादी वाढतच जाईल.
मात्रा शहाणपणा आणि शाहरूखचे ब-याचदा जमत नाही. अमरसिंगवर फिल्मफेअरच्या कार्यक्रमात खालच्या पातळीवर केलेला विनोद आजही अनेकांच्या लक्षात आहे. 2000 मध्ये हृतिकचे दणदणीत आगमन झाले. हृतिकने कोकची जाहिरात केली. त्या जाहिरातीचे शाहरूखने विडंबन केले होते. या सारख्या घटनांमधून शाहरूखचा कोतेपणा दिसून येतो. दिलीपकुमार आणि अमिताभ बच्चन यांच्या अभिनयाची एकत्रीत आवृत्ती म्हणजे शाहरूख असाही त्याच्यावर आरोप होतो.
ओसामा बिन लादेन नंतर सर्वाधिक लोकप्रिय मुसलमान असल्याचं त्याचं वक्तव्य त्याची बौद्धीक पातळी दाखवून देणारं आहे. पैश्यासाठी उद्योगपतींच्या लग्न आणि कार्यक्रमात नाचणा-या या नाच्यांकडून पैश्याच्या गुर्मीत कुणासाठी चांगलं बोललं जाईल अशी अपेक्षाही करणं गैर आहे. त्यामुळे बीसीसीआय आता तरी जागे व्हा. तुमच्या पैशाच्या बाजारात क्रिकेटचे सत्व विकू देवू नका. क्रिकेटच्या देवतांवर आघात होवू देवू नका. क्रिकेटचा संघ विकत घेणारे अनेक मिळतील. मात्र वेस्ट इंडिजचा तोफखाना हेल्मेटशिवाय निधड्या छातीने टोलावून लावणारा सुनील गावस्कर मिळणार नाही. आता पैसा श्रेष्ठ की क्रिकेट संघाचा मालक याचा निर्णय कोण घेणार ?

कार्यकर्त्यांनो फक्त सतरंजी उचला

चला आता लोकसभेच्या निवडणुकीला सुरूवात झालीय. त्यामुळे पाच वर्ष अडगळीत पडलेला आम आदमी आता आम राहिलेला नाही. राम पुन्हा त्यांच्या जन्म ठिकाणी जाण्याचीही शक्यता निर्माण झालीय. धर्मनिरपेक्षतेच्या नावाखाली तीन ते चार आघाड्याही निर्माण झाल्यात. सर्वच पक्षांनी तिकीट दिलेले उमेदवार आता त्यांचे अर्ज दाखल करताहेत. मोठ्या जल्लोषात उमेदवार अर्ज दाखल करताहेत. एकाच मतदारसंघातून उभे असलेले सर्वच उमेदवार आपण जिंकणार असल्याचा दावाही करताहेत. आता यात नवल आणि वेगळं वाटावं असं तरी काय आहे ?
यात वेगळं असं काहीच नाही. मात्र किती निवडणुकांमध्ये हे सहन करायचं, याचा विचार आता करावाच लागेल. सर्व राष्ट्रीय पक्षांनी जाहीर केलेल्या उमेदवारांच्या यादीवर नजर टाकली तरी लक्षात येतं की, निवडणूक लढवणं हे आता सर्वसामान्यांचं काम राहीलेलं नाही. निवडणूक लढवायची असेल तर तुमचा जन्म राजकीय घराण्यातच व्हायला हवा. नाही तर तुमच्याकडे गडगंज संपत्ती हवी. किंवा गुन्हेगारी क्षेत्रातल्या करीअरचा ग्राफही उंचावलेला असेल तरच तुम्हाला तिकीट मिळेल.
निलेश राणे, मिलिंद देवरा, प्रिया दत्त या तिघांनी कोणतं असं अतुलनीय कर्तृत्व केलंय की त्यांना काँग्रेसने खासदारकीचे तिकीट दिले. नारायण राणे यांनी तर शिवसेनाप्रमुखांवर पुत्र प्रेमाने आंधळे झाल्याचा आरोप केला होता. मात्र सिंधुदुर्ग - रत्नागिरीतून खासदारकीचे तिकीट नारायण राणे यांनी स्वत:च्या मुलासाठीच घेतले. यावेळी ते पुत्रप्रेमात डोळस झाले. इतर पक्षात अन्याय होतोय असा आरोप करणारे नेतेही मुलांच्याच भवितव्याची काळजी घेणार असतील, तर ज्यांच्या जिवावर स्वाभिमानाचं राजकारण होतं ते कार्यकर्ते फक्त राडाच करणार हे आता स्पष्ट आहे. काँग्रेस का हाथ आम आदमीच्या कामी आला की नाही हे निकालानंतर कळेल. नेत्यांचे राजकीय वारसदार जपण्याचे काम मात्र चोखपणे बजावण्यात आल्याचं दिसून येतंय.
युवकांना निवडणुकीत संधी देण्याची भाषा करणा-या सगळ्याच पक्षांनी राज्यात विद्यमान खासदार, माजी खासदार, नेत्यांची कर्तृत्ववान (दिवटे) मुले यांनाच तिकीटे दिली आहेत. यात कोणत्याही पक्षात मतभेद नसल्याचं दिसून येतं. त्यामुळे नेत्यांसाठी रस्त्यावर उतरणा-या सामान्य कार्यकर्त्यांनी आता विचार करण्याची वेळ आलीय. तुम्ही फक्त राडा करायचा, सतरंज्या उचलायच्या आणि खासदारकी, आमदारकी उपभोगायची ती नेत्यांच्या दिवट्यांनी.